ब्रेकिंग न्यूज

बेदम मारहाण करून दुचाकी व रोकड लुटणारे आरोपी जेरबंद.

एक आरोपी अटकेत,सीसीटीव्ही आधारे गेवराई पोलिसांची कारवाई.

 

बीड(| प्रतिनिधी)गेवराई तालुक्यात पहाटेच्या सुमारास एका वृद्धाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याची दुचाकी व रोकड लुटणाऱ्या आरोपींना गेवराई पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे जेरबंद केले आहे. या प्रकरणातील एक आरोपी अटकेत असून दुसरा आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 14 मे 2026 रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सुदाम सावंत हे जय भवानी साखर कारखान्यातील काम संपवून त्यांच्या MH23BB2034 क्रमांकाच्या स्प्लेंडर दुचाकीवरून घरी जात होते. राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 जवळील रांजणी शिवार परिसरात लघुशंकेसाठी थांबले असता एका स्कूटीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी “मामा, काय झाले गाडीला?” अशी विचारपूस करत अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. आरोपींनी वृद्धाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या खिशातील 1400 रुपये रोख रक्कम व दुचाकी घेऊन घटनास्थळावरून पलायन केले.

घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी वरिष्ठांना माहिती देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश कोटकर व तपास पथकाने तातडीने तपास सुरू करत घटनास्थळावरील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच तांत्रिक पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात यश आले.

या प्रकरणी आरोपी आवेज खान परवेज खान (वय 25, रा. बार्शी नाका, बीड) याला सापळा रचून अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीस गेलेली मोटारसायकल व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. गुन्ह्यातील दुसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

फिर्यादीच्या तक्रारीवरून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 298/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 309(4), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ लक्ष्मण जायभाये हे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासात तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button