साई मोबाईल शॉपी फोडून ३५ लाखांचे मोबाईल लंपास.
चोरटे सीसीटीव्हीत कैद ! व्यापाऱ्यात भीतीचे वातावरण.

बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील गजबजलेल्या सुभाष रोड परिसरात धाडसी चोरीची घटना घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. स्टेडियम कॉम्प्लेक्स भागातील साई मोबाईल शॉपीचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी अंदाजे ३० ते ३५ लाख रुपये किंमतीचे महागडे मोबाईल व रोख रक्कम लंपास केल्याची घटना रविवारी (दि. १९) सकाळी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री सुमारे २:३० वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर फोडून आत प्रवेश केला. दुकानातील महागडे मोबाईल आणि रोख रक्कम असा मोठा ऐवज त्यांनी चोरून नेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांकडून त्याच्या आधारे तपास सुरू आहे.
अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर विक्री वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन दुकानदाराने मोठ्या प्रमाणात महागडे मोबाईल साठवले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले असून पंचनामा करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. तसेच या भागात यापूर्वीही मोबाईल शॉपी फोडल्याची घटना घडली असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, गेल्या आठ दिवसांत बीड शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून याआधी तीन मोबाईल दुकाने फोडण्यात आली आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार संदीप क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करून शहरातील वाढत्या चोरींवर आळा घालण्यासाठी रात्रीची ग्रस्त वाढवावी अशी मागणी नागरिक व व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.






