ब्रेकिंग न्यूज

फरार आरोपीच्या अटकेसाठी पिडित जाधवर कुटुंबिय उपोषण करणार.

ग्रामीण पोलीसांचे आरोपीला अभय ? फाटेचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

बीड(प्रतिनिधी)बीड जीएसटी कार्यालयामधील मयत अधिकारी सचिन जाधवर प्रकरणातील फरार आरोपी प्रदीप फाटे याला तातडीने अटक करण्यात यावी,अन्यथा २५ फेब्रुवारी २०२६ पासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा मयुरी सचिन जाधवर यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षकांना लेखी निवेदन दिले आहे. बीड ग्रामीण पोलीस तपाशी अधिकारी फाटे यांना अटक करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप मयत सचिन जाधवर यांच्या पत्नीने केला आहे.

दिलेल्या निवेदनानुसार, सचिन जाधवर यांचा १७ जानेवारी २०२६ रोजी मृत्यू झाला असून २३ जानेवारी रोजी संबंधित गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी प्रदीप फाटे याला अटक करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी १३ फेब्रुवारी रोजी निर्देश दिल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच या प्रकरणात न्यायालयाने ११ फेब्रुवारी रोजी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळल्याचा दावा करण्यात आला आहे. तरीही संबंधित आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे.

आरोपीला अटक करण्यात पोलिसांकडून टाळाटाळ होत असून आरोपीला संरक्षण दिले जात असल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. आरोपीला तात्काळ अटक न झाल्यास २५ फेब्रुवारीपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर पीडित कुटुंबीय व नातेवाईक आमरण उपोषणास बसणार असल्याचे मयुरी जाधवर यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या प्रकरणाकडे लक्ष देऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button