खुनातील आरोपीला बारा तासाच्या आत बेड्या.
स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी; जुन्या वादातून केला होता खून.

बीड(प्रतिनिधी)माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणाचा अवघ्या १२ तासांत उलगडा करत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली आहे.
तालखेड येथील जावई विकास दत्तात्रय वाघमोडे (वय ३३) यांचा मृतदेह २९ जून रोजी त्यांच्या शेताजवळ आढळून आला होता. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या पथकाला तपासादरम्यान महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. त्यानुसार आदित्य बारवाळ याच्यासोबत मयत विकास वाघमोडे याचे काही दिवसांपूर्वी गंभीर वाद झाले होते. तसेच दोघांमध्ये मारामारी होऊन एकमेकांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी आदित्य बारवाळ याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत, जुन्या वादाच्या रागातून २८ जून रोजी रात्री सुमारे ११ वाजता विकासचा पाठलाग करून शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर चाकूने पोटावर दोन आणि गळ्यावर एक वार करून खून केल्याची माहिती दिली.
कबुलीजबाबानंतर आरोपीला पुढील कारवाईसाठी माजलगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, पोलीस उपअधीक्षक ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने तसेच बप्पासाहेब घोडके, महेश जोगदंड, जफर पठाण, दिलीप गित्ते आणि गणेश मराडे यांच्या पथकाने पार पाडली.







