प्राणघातक हल्ल्याला महिना उलटला,तरी आरोपी मोकाट कसे?
गेवराई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह;आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी SP कॉवत यांना निवेदन.

बीड(प्रतिनिधी)गेवराई शहरातील बायपास रोडवरील पेट्रोल पंपाजवळ 29 मे 2026 रोजी झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल होऊनही तब्बल एक महिना उलटला तरी आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याने गेवराई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणी पीडिताची आई सखुबाई भुराजी शिंदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी निवेदन देत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, 26 मे 2026 रोजी मंगेश भुराजी शिंदे याच्यावर सचिन बबन राठोड व त्याच्या साथीदारांनी जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 332/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 109, 118(1), 115(2) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदारांचा आरोप आहे की, गुन्हा दाखल होऊनही आरोपी अद्याप गेवराई शहरात खुलेआम फिरत असून पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही. आरोपींकडून वारंवार तडजोड करण्यासाठी धमक्या दिल्या जात असून पीडित कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यापूर्वीही 4 जून रोजी या संदर्भात लेखी तक्रार देण्यात आली होती. तसेच आरोपी शहरात फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणीही करण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सखुबाई शिंदे यांनी या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून संबंधित तपासी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि फरार आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. या निवेदनाच्या प्रती पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर आणि गृह सचिव, महाराष्ट्र शासन यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
एक महिना उलटूनही आरोपी फरार असल्याने पोलिसांच्या तपासाची गती आणि कार्यक्षमतेवर नागरिकांकडूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.







