परवान्याच्या नावाखाली बीडमध्ये पत्त्यांच्या क्लबचा सुळसुळाट.
शहर-ग्रामीण भागात जुगार बाजार पुन्हा तेजीत.

बीड( प्रतिनिधी)बीड शहरासह ग्रामीण भागात अवैध जुगारधंद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे चित्र दिसून येत आहे. परवान्याच्या नावाखाली पत्त्यांच्या क्लबचा सुळसुळाट झाला असून अनेक ठिकाणी खुलेआम जुगार सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. या प्रकाराकडे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने नेमून दिलेल्या नियम व अटीची पायमल्ली होत असताना दिसत आहे, यामुळे अशा नियम मोडणाऱ्या मनोरंजनाच्या पत्त्याचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी होत आहे. यामध्ये काही विनापरवाना देखील पत्त्याचे क्लब राजू सुरू असल्याचे दिसत आहे. बीडमध्ये पत्त्याच्या क्लबचा परवाना एवढ्या मोठ्या प्रमाणात कसे मिळतात असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. तसेच स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.
काही महिन्यांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर शहरातील बेकायदेशीर हालचालींना मोठ्या प्रमाणात आळा बसला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मटका, गुटखा,जुगार, चक्री, सॊरट धंद्यांनी पुन्हा वेग घेतल्याचे दिसत असून अवैध धंद्यावर पोलिसांच्या कारवाया थंडावल्याचे देखील दिसत आहे.
शहरासह पिंपळनेर,बीड ग्रामीण भागात तसेच बीड जिल्ह्यात परवान्याच्या नावाखाली पत्त्यांचे क्लब सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.संबंधित ठिकाणी नियमांचे पालन होत नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात जुगाराच्या विळख्यात अडकत असून अनेकांवर लाखो रुपयांचे कर्ज झाल्याची माहिती मिळत आहे. कर्जबाजारीपणामुळे काही युवकांनी शहर सोडल्याच्याही चर्चा आहेत.
दरम्यान, जुगारासाठी पैसे पुरविणाऱ्या काही खासगी सावकारांनी महिन्याऐवजी रोजच्या हप्त्यावर कर्जवाटप सुरू केल्याचेही बोलले जात आहे. यामुळे आर्थिक अडचणींसह व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
बीड शहरात मटका,गुटखा,जुगार,सोरट,चक्री अवैध दारू पुन्हा सुरू झाल्याचे चित्र असून, या वाढत्या अवैध कारभारावर पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. जुगारधंदे नेमक्या कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत, हा प्रश्नही आता चर्चेचा विषय बनला आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







