खूनातील फरार आरोपी जेरबंद.
गंभीर गुन्ह्यात फरार असताना केला होता एकाच खून;गेवराई पोलिसांची कामगिरी.

गेवराई, दि. 17 – खूनाच्या गुन्ह्यातील तब्बल तीन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला गेवराई पोलिसांनी शिताफीने पकडून धारूर पोलिसांच्या ताब्यात दिले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून गेवराई पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.
धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 237/2026 अन्वये कलम 103(1), 351(2), 351(3), 3(5) भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत दाखल असलेल्या खून प्रकरणातील आरोपी विश्वास उर्फ पोपट दादाराव डोंगरे (वय 44, रा. बार्शी नाका, बीड) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.
पोलीस निरीक्षक किशोर पवार यांना आरोपी मौजे रांजणी येथे असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वरिष्ठांना माहिती देऊन विशेष पथक रवाना केले. रात्री सुमारे 11.30 वाजता पोलिसांनी सापळा रचला असता आरोपीला पोलिसांची चाहूल लागली आणि त्याने अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
विशेष म्हणजे, प्रकाश आंबेडकर नगर मध्ये मार्च महिन्यात धुलीवंदन दिवशी एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती या प्रकरणी गुन्हा पेठ बीड पोलीस ठाण्यात दाखल होता.मारहाणीच्या घटनेपासून पोपट डोंगरे फरार होता.त्यानंतर फरारी अवस्थेत असतानाच खूनाच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग समोर आल्याने मोठी खळबळ उडाली होती.
ताब्यात घेतलेल्या आरोपीला गेवराई पोलीस ठाण्यात आणून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर पुढील तपासासाठी त्याला धारूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई श्रीमती चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक (अंबाजोगाई) तथा प्रभारी पोलीस अधीक्षक बीड, समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बीड आणि अनिल कटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत पोलीस निरीक्षक किशोर पवार, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश पारधी, सफौ नितीन शिंदे, पोह लक्ष्मण जायभाय, पोकॉ जितेंद्र ओव्हाळ, गोरक्ष डोके, महादेव कदम, संदीप कांबळे तसेच चापोकॉ राजेंद्र चोरमले यांनी सहभाग घेतला.











