घरफोडी करणारा सराईत आरोपी जेरबंद.
दोन घरफोड्यांचे गुन्हे उघड;बीड स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.

बीड, दि. 17 – बीड शहरातील दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून सराईत आरोपी कलीम अलीम शेख (वय 32, रा. दहीफळ, ता. जि. बीड) याला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून घरफोडीसाठी वापरलेली दुचाकी तसेच चोरीतील नगदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 155/2026 अन्वये 9 जून रोजी घरफोडीची नोंद झाली होती. फिर्यादी कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून कपाटातील सोने व रोख रक्कम लंपास केली होती. या गुन्ह्याचा तपास शिवाजीनगर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता.
सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कलीम शेख याच्यावर संशय बळावला. दरम्यान, 15 जून रोजी तो नाळवंडी नाका परिसरात असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने शिवाजीनगरमधील घरफोडीची कबुली दिली. तसेच बीड शहरातील हिना नगर परिसरातील आणखी एका बंद घरात चोरी केल्याचेही उघड केले. अभिलेख पडताळणीत हा गुन्हा बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 126/2026 म्हणून नोंद असल्याचे समोर आले.
या कारवाईमुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचा गुन्हा क्रमांक 155/2026 आणि बीड शहर पोलीस ठाण्याचा गुन्हा क्रमांक 126/2026 असे दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कामगिरी प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार राहुल शिंदे, गोविंद राख, पोलीस अंमलदार आश्पाक सय्यद, मनोज परजणे व चालक नितीनजी वडमारे यांनी पार पाडली. आरोपीला पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.







