न.प.CO शैलेश फडसे यांची बदली.
फडसेयांची नांदेड आयुक्तपदी नियुक्ती.नूतन मुख्याधिकारी कोण?

बीड, दि. १७ जून : महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी, गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत आदेश जारी केले आहेत. त्यानुसार बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली आहे.
शासन आदेशानुसार श्री. फडसे यांची जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सह गट-अ आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही बदली रिक्त पदावर करण्यात आली असून सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने हा निर्णय घेण्यात आला आहे.
शासनाने श्री. फडसे यांना १७ जून २०२६ रोजी दुपारपासून त्यांच्या सध्याच्या पदावरून कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी १८ जून २०२६ रोजी नव्या पदावर रुजू होऊन त्याबाबतचा अनुपालन अहवाल तात्काळ शासनाकडे सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
विकासकामांना गती देणारे स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन, पायाभूत सुविधा आणि प्रशासनातील शिस्त यासाठी ओळख झाली होती.
श्री. फडसे यांनी बीड नगरपरिषदेत कार्यरत असताना शहरातील स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा, अतिक्रमण हटाव मोहिमा, विविध विकासकामांना गती, कर वसुली वाढविणे, नागरिकाभिमुख प्रशासन आणि शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर दिला. त्यांच्या कार्यकाळात शहरातील अनेक प्रलंबित कामांना चालना मिळाली.
शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छ भारत अभियान, घनकचरा व्यवस्थापन आणि नगरपरिषदेच्या उत्पन्नवाढीसाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयांची प्रशासनात विशेष दखल घेतली जाते. कठोर पण समन्वयवादी प्रशासकीय शैलीमुळे त्यांनी नगरपरिषदेच्या कामकाजात शिस्त आणण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्या बदलीमुळे बीड नगरपरिषदेच्या पुढील मुख्याधिकाऱ्यावर सुरू असलेली विकासकामे आणि प्रशासनाची गती कायम ठेवण्याचे आव्हान असणार आहे.
नगर विकास विभागाचे अवर सचिव अ.का. लक्कस यांच्या स्वाक्षरीने हा शासन आदेश निर्गमित करण्यात आला असून, बीड नगरपरिषदेसह संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणांना त्याची प्रत पाठविण्यात आली आहे.







