
लिंबागणेश, दि. १ (प्रतिनिधी) – बीड तालुक्यातील लिंबागणेश–अंजनवती मार्गावरील गणेशमाळ परिसरात सोमवारी सकाळी अंजनवती येथील किरण बंडू सोनावणे यांचा रस्त्याच्या बाजूला संशयास्पद मृतदेह आढळला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा अपघात आहे की घातपात, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या दरम्यान व्यायामासाठी जाणाऱ्या काही महिलांना रस्त्याच्या कडेला एक दुचाकीस्वार पडलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी जवळ जाऊन पाहणी केली असता संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर ग्रामस्थ व पोलिस प्रशासनाला तातडीने माहिती देण्यात आली.
घटनास्थळी एमएच १६ एआर २६६१ क्रमांकाची दुचाकी आढळून आली. मृत व्यक्तीची ओळख अंजनवती येथील किरण बंडू सोनावणे अशी पटली.
ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री परिसरात वादळी पाऊस व जोरदार वारे झाल्याने दुचाकीचा ताबा सुटून अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघातानंतर दुचाकीखाली दबल्या गेल्याने त्यांना मदत मिळू शकली नसावी, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, मृतदेह ज्या अवस्थेत आढळून आला त्यामुळे काहींनी संशयही व्यक्त केला असून हा केवळ अपघात आहे की घातपात, हे पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे अंजनवतीसह परिसरात शोककळा पसरली आहे.











