ब्रेकिंग न्यूज

बीड पोलीस दलात अधिकाऱ्यांच्या बदल्या;चार पोलीस निरीक्षक जिल्हाबाहेर बदली .

पेठ बीड पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांची पुणे शहरला बदली.

तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक बीडमध्ये दाखल होणार; दोन अधिकाऱ्यांना एक वर्षाची मुदतवाढ

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्हा पोलीस दलातील कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त लागला असून शनिवारी जाहीर झालेल्या यादीत चार पोलीस निरीक्षक आणि तीन सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्हाबाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत. तर तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक बीड जिल्ह्यात दाखल होणार असून दोन अधिकाऱ्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. या बदल्यांमुळे पोलीस प्रशासनात मोठी हालचाल सुरू झाली असून पेठ बीड पोलीस ठाण्याला नव्या ठाणेदाराची प्रतीक्षा लागली आहे.

जिल्ह्यातील बदल्यांमध्ये पोलीस निरीक्षक बालक कोळी, देवीदास गात, सध्या पेठ बीड पोलीस ठाण्याचे प्रभारी मारोती खेडकर आणि नारायण एकसिंगे यांचा समावेश आहे. बालक कोळी यांची सोलापूर शहर येथे बदली झाली असून त्यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झाला होता. देवीदास गात यांची कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच बदली करण्यात आली असून ते सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात रुजू होणार आहेत. मारोती खेडकर यांची पुणे शहर येथे बदली झाली आहे. तर नारायण एकसिंगे यांची पूर्वी मुंबईला झालेली बदली रद्द करून त्यांची गडचिरोली येथे नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षकांमध्ये महेंद्रसिंग सुरेंद्रसिंग ठाकूर, भार्गव सुदाम सपकाळ आणि संतोष तेजराम जंजाळ यांच्या जालना येथे बदल्या करण्यात आल्या आहेत. ठाकूर यांनी बर्दापूर येथे प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहिले होते, तर सपकाळ यांनी अंमळनेर येथे जबाबदारी सांभाळली होती. संतोष जंजाळ यांनी गेवराई येथे दुय्यम अधिकारी म्हणून कार्य केले होते.

दरम्यान, बीड जिल्ह्यात नवीन अधिकारी म्हणून छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथून सपोनि जनाबाई आश्रुबा सांगळे, धाराशिव येथून सपोनि कल्याण भास्कर नेहरकर आणि सपोनि सुरेश कचरू नरवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, चंद्रकांत गोविंद गोसावी आणि रत्नाकर मधुकर घोळवे या दोन सहाय्यक पोलीस निरीक्षकांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. नेकनूर येथे कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर गोसावी यांच्या बदलीची चर्चा सुरू असताना त्यांना पुन्हा बीड जिल्ह्यातच मुदतवाढ मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मागील आठवड्यातच बीड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या पार पडल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा झालेल्या या बदल्यांमुळे जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय हालचालींना वेग आला असून विशेषतः पेठ बीड पोलीस ठाण्याच्या नव्या ठाणेदाराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button