बीड पोलिस व समाजसेवकांची माणुसकी !!
दोन बेवारस प्रेतावर अंत्यसंस्कार करून दाखवली माणुसकी.

बीड(प्रतिनिधी)आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात नात्यांपेक्षा पैशाला अधिक महत्त्व दिले जात असल्याचे अनेकदा दिसून येते. मात्र, अशा परिस्थितीतही माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे हृदयस्पर्शी उदाहरण बीड शहरात पाहायला मिळाले. दोन बेवारस मृतदेहांवर कोणताही वारसदार किंवा नातेवाईक पुढे न आल्याने बीडमधील पोलिसांनी व समाजसेवकांनी पुढाकार घेत त्यांच्यावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करून समाजासमोर माणुसकीचा आदर्श ठेवला.
मिळालेल्या माहितीनुसार, चकलंबा परिसरातील एक महिला भीक मागून उदरनिर्वाह करत होती. प्रकृती खालावल्याने तिला उपचारासाठी बीड येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच तिचे दुःखद निधन झाले. मृत्यूनंतर तिच्या अंत्यसंस्कारासाठी कोणताही नातेवाईक किंवा ओळखीची व्यक्ती पुढे आली नाही. त्यामुळे तिचा मृतदेह बेवारस अवस्थेत होता.
याच दिवशी नेकनूर परिसरातील एका वयोवृद्ध व्यक्तीचेही निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठीही कुणी पुढे न आल्याने दोन्ही मृतदेह बेवारस असल्याची बाब समोर आली. ही माहिती मिळताच बीड शहरातील समाजसेवकांनी तातडीने पुढाकार घेत दोघांनाही आपल्या कुटुंबातील सदस्य मानत धार्मिक विधीनुसार सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले.
या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित समाजसेवकांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले होते. जिवंतपणी आधार मिळाला नसला, तरी मृत्यूनंतर सन्मानाने निरोप मिळावा या भावनेतून त्यांनी हे कार्य केले. त्यामुळे परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले होते.
आज रक्ताची नातीही दुरावत चालल्याच्या काळात कोणतीही अपेक्षा न ठेवता बेवारस व्यक्तींच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारणाऱ्या या समाजसेवकांनी खऱ्या अर्थाने माणुसकीचा धर्म जपला आहे. त्यांच्या या कार्यामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
या अंत्यविधीसाठी पोलीस प्रशासनाचेही सहकार्य लाभले. पोलीस आणि समाजसेवकांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडलेल्या या अंत्यसंस्कारामुळे सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलतेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले.
या अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेणाऱ्यांमध्ये राजू वंजारे, अभिजीत वैद्य, पत्रकार वैभव स्वामी, राजूभाऊ गुळभिले, विजय पंडित, डॉ. संजय तांदळे, गणेश माने, छाया सरोदे, किरण डोळस, सारिका गायकवाड आणि यश वंजारे यांचा समावेश होता. त्यांच्या निःस्वार्थ सेवेमुळे पुन्हा एकदा “माणुसकी अजूनही जिवंत आहे” याचा प्रत्यय समाजाला आला आहे.










