समाजकंटकाने हनुमान मूर्तीची केली विटंबना.
ब्रम्हगावमध्ये तणावपूर्ण शांतता,समाजकंटकांवर कठोर कारवाई करा :किशन चव्हान

बीड प्रतिनिधी )बीड गेवराई तालुक्यातील ब्रम्हगाव येथे मारुती मंदिरातील हनुमान मूर्तीची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. मंदिरातील मूर्तीला मटन (मांस) चिकटवून धार्मिक भावना दुखावण्याचा घृणास्पद प्रकार घडल्याने गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रम्हगाव येथील मारुती मंदिरात गुरुवारी पहाटे काही ग्रामस्थ दर्शनासाठी गेले असता मूर्तीवर मांस चिकटवण्यात आल्याचे निदर्शनास आले. यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ चकलांबा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत या गंभीर प्रकाराची दखल घेत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मात्र, ग्रामस्थांनी संशय व्यक्त केलेल्या दोन व्यक्तींविरुद्ध अद्याप ठोस कारवाई किंवा अटक न झाल्याने गावात संतापाची लाट उसळली होती घटनेनंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात ठेवत नागरिकांची समजूत काढली व त्या समाजकंटकाला अटक करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, संतप्त भक्त आणि नागरिकांनी चकलांबा पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक इंगळे यांना निवेदन देत या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आरोपींना तातडीने अटक न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
या घटनेची माहिती मिळताच बीड येथील युवा नेते किशन चव्हाण यांनी ब्रहमगांव येथील हनुमान मंदिर घटनास्थळी भेट देत घटनेची सविस्तर माहिती घेत अशा समाजकंटकांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी सकाळी ९ वाजता मारुती मंदिरात ग्रामस्थांच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.गावात शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. धार्मिक सलोखा बिघडविणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.






