NEET पेपरफुटी प्रकरणात बीड कनेक्शनची चर्चा.
पेपरफुटीने विद्यार्थ्यांचे नुकसान,कुलकर्णीमुळे पुन्हा चर्चेत बीड.

बीड(प्रतिनिधी)बीड राज्यात गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पी. व्ही. कुलकर्णी याचे बीडशी असलेले संबंध समोर आल्यानंतर जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे. कुलकर्णीचे बालपण, प्राथमिक तसेच महाविद्यालयीन शिक्षण बीडमध्ये झाल्याची माहिती पुढे आली असून त्याचे कुटुंबही अनेक वर्षे बीडमध्ये वास्तव्यास होते, अशी चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुलकर्णीचे वडील बीड जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून कार्यरत होते.
बीड शहरातील शाहूनगर परिसरात त्यांचे वास्तव्य होते. तसेच त्या भागात कुलकर्णीच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. पाटोदा तालुक्यात काही शेती असल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान, बीडमधील काही खासगी क्लासेस चालकांशी कुलकर्णीचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याच्या चर्चेमुळे संशय अधिक गडद झाला आहे. या संबंधातून NEET पेपरफुटीचे धागेदोरे बीडपर्यंत पोहोचले असावेत, अशी चर्चा सुरू असली तरी याबाबत अधिकृत स्तरावर कोणतीही पुष्टी झालेली नाही.
या पार्श्वभूमीवर काही निनावी तक्रारी संबंधित यंत्रणांकडे दाखल झाल्याचे समोर येत असून त्या तक्रारींची पडताळणी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. NEET पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत असताना, या प्रकरणामुळे बीड पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.











