लाच घेताना महिला एसीबीच्या जाळ्यात.
लाचखोरांचा सुळसुळाट ! सोलर प्रकल्प पडताळणीसाठी मागितली लाच.

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, गेवराई तालुक्यात ग्रामसेवकाला लाच घेताना रंगेहात पकडल्याची घटना ताजी असतानाच अवघ्या २४ तासांत आष्टी येथे महिला सहाय्यक अभियंता एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
या कारवाईमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाली की बीड जिल्ह्यात लाच मागण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असून कोणत्याही शासकीय निमशासकीय कार्यालयात पैसे दिल्याशिवाय कामात होत नसल्याच्या तक्रारी देखील आहेत. लाच मागण्यांमध्ये महिला कर्मचारी अधिकारी देखील कमी नाहीत हे या कारवाईवरून सिद्ध झाले आहे.
मंगळवारी (दि. २१) आष्टी येथील महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता कोमल शिंदे यांना १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या सोलर प्रकल्पाची पडताळणी करून देण्यासाठी शिंदे यांनी १८ हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर सापळा रचण्यात आला.
दरम्यान, तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने शिंदे यांना रंगेहात पकडले. ही कारवाई उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
मागील दोन महिन्यापासून लाचखोरावर होत असलेल्या सलग कारवायांमुळे महावितरणसह शासकीय विभागांत खळबळ उडाली असून एसीबीकडून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत मच्छिंद्र बीडकर, अमोल खरसाडे, प्रदीप सुरवसे आणि अंबादास पुरी यांनी सहभाग घेतला.





