लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात.
लाचखोरांनी लाजा सोडल्या ? पी.टी.आर.साठी 10 हजारांची मागणी.

बीड (प्रतिनिधी) सरकारी यंत्रणेत लाचखोरीचा विळखा अधिकच घट्ट होत चालल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा समोर आले आहे. सामान्य नागरिकांकडून कामासाठी सरळसरळ लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांची निर्लज्जता वाढत चालली असून, मागील महिन्यापासून महसूल विभागात अनेक कारवाया झाल्या आहेत तरी देखील लाचखोरीच्या प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. मागील महिन्यातच केज व परळी येथील ग्रामसेवक तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकले होते ही घटना ताजी असतानाच पुन्हा लाच घेताना ग्रामसेवक ग्रामसेवक रंगेहात सापडल्याने एकच उडाली आहे.
पैसे दिले नाही तर काम किंवा फाईल विविध कारणे सांगून टाळले जातात तसेच अडथळे निर्माण केले जातात त्यामुळे नाविजास्तव नागरिकांना पैसे द्यावे लागतात.
तलवाडा येथील ग्रामसेवक सोपान मुसळे याला ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले यामुळे एकच खळबळ उडाली.
सदर प्रकरणामुळे प्रशासनातील भ्रष्टाचाराचा रोग किती खोलवर पसरला आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. कोणत्याही शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये “लाच दिल्याशिवाय काम होत नाही” हीच व्यवस्था झाली आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रकरण काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराकडून पीटीआर देण्यासाठी आरोपी ग्रामसेवकाने सुरुवातीला तब्बल १० हजार रुपयांची मागणी केली होती. नंतर तडजोड करून ५ हजारांवर सौदा ठरवण्यात आला. नागरिकांना अक्षरशः वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तक्रारदाराने धाडस दाखवत जालना येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीची खातरजमा झाल्यानंतर सोमवारी गेवराई येथे सापळा रचण्यात आला. आरोपी मुसळे याने ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.
ही कारवाई एसीबीचे उपअधीक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, आरोपीविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाचखोरीला आळा कधी बसणार?
गेल्या काही महिन्यांत एसीबीच्या कारवायांमध्ये वाढ झाली असली, तरी लाचखोरीचे प्रमाण कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई आणि कडक शिक्षा होणे अत्यंत गरजेचे असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.










