ब्रेकिंग न्यूज

नेकनूर ग्रामपंचायतला डॉ.आंबेडकर पुतळ्याची एलर्जी आहे का?

पुतळा हटवण्यासाठी पत्र;ग्रामपंचायत व भीमसैनिकांमध्ये संघर्षाची ठिणगी.

बीड(प्रतिनिधी)बीड तालुक्यातील नेकनूर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता दिसू लागली आहे. काही दिवसांपूर्वी आठवडी बाजार तळावर उभारण्यात आलेल्या या पुतळ्याला सुरुवातीला कोणताही विरोध झाला नव्हता.उलट मंगळवारी (दि. १४) मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. मात्र त्यानंतर ग्रामपंचायतीकडून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रामुळे वातावरण ढवळून निघाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच अनिता लांडगे आणि ग्रामविकास अधिकारी डी. एस. नागरे यांनी ग्रामपंचायतीच्या लेटरपॅडवरून १३ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत हा पुतळा अनधिकृत असल्याचे सांगत तो हटवण्याची मागणी केली आहे. हे पत्र बुधवारी (दि. १५) सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भीमसैनिकांमध्ये नाराजीची लाट उसळली आहे.

विशेष म्हणजे, पुतळा उभारल्यानंतर स्थानिक पातळीवर कोणताही विरोध झाला नव्हता. सकाळी पुतळा दिसल्यानंतर अनेकांनी तेथे जाऊन अभिवादन केले होते. जयंतीही शांततेत पार पडली. त्यामुळे अचानक ग्रामपंचायतीने घेतलेल्या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

नेकनूरची बाजारपेठ मराठवाड्यातील महत्त्वाची आणि मोठी मानली जाते. येथे सर्व समाजातील लोकांची वर्दळ असते. भविष्यात इतर महापुरुषांचेही पुतळे उभारले जाऊ शकतात, यामुळे सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कारण ग्रामपंचायतीकडून दिले जात आहे.

दरम्यान, “पुतळ्याला कुणाचाही विरोध नसताना तो हटवण्याची मागणी का?” असा सवाल उपस्थित करत काही नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या भूमिकेवर टीका केली आहे. या प्रकरणामुळे दोन गटांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्याच्या परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सर्व संबंधित पक्षांना विश्वासात घेऊन तोडगा काढावा, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button