महादेव मुंडे खून;तपास प्रकरणी खोटी माहिती पसरवनारावर गुन्हे दाखल होणार.
ब्रेन मॅपिंग,पोलोग्राफ लाई डिटेक्टर बाबद खोट माहिती पसरवल्यास पोलिस कारवाई करणार.

बीड(प्रतिनिधी)बीड परळी तालुक्यात दोन वर्षांपूर्वी घडलेल्या आणि राज्यभर गाजलेल्या महादेव मुंडे खून प्रकरणाच्या तपासाबाबत अफवा पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बीडच्या विशेष तपास पथकाने (SIT) दिला आहे. या संदर्भात पोलिसांकडून अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.
प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्यानुसार, सदर प्रकरणातील तपासाशी संबंधित विविध मानसशास्त्रीय चाचण्यांचे अहवाल, तपासाची कागदपत्रे व इतर माहिती अत्यंत गोपनीय स्वरूपाची असून ती कुठेही प्रसिद्ध किंवा प्रसारित करण्यात आलेली नाही. तसेच ही माहिती प्रसारमाध्यमे किंवा सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आलेली नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, परळी शहरातील शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते राजाभाऊ फड यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात काही लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप केले होते. ब्रेन मॅपिंग व लाई डिटेक्टर चाचण्यांमधून काही माहिती समोर आली असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय व सामाजिक स्तरावर मोठी खळबळ उडाली होती.
मात्र, पोलिसांनी जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार अशा प्रकारची कोणतीही माहिती तपास यंत्रणेकडून अधिकृतपणे कोणालाही देण्यात आलेली नाही. त्यामुळे तपासाशी संबंधित खोटी माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या तक्रारीवरून परळी शहर पोलीस ठाणे, जि. बीड येथे गुन्हा क्रमांक 191/2023 भा.दं.वि. कलम 302 अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध 22 ऑक्टोबर 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास बीड येथील विशेष तपास पथक (SIT) मार्फत सुरू आहे.
तपासादरम्यान काही संशयित व्यक्तींवर पॉलीग्राफ (लाई डिटेक्टर), BEOS / ब्रेन मॅपिंग तसेच व्हॉईस अॅनालिसिस अशा मानसशास्त्रीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांचे अहवाल अत्यंत गोपनीय असून ते तपास यंत्रणेकडे सुरक्षित ठेवण्यात आलेले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
अलीकडे या प्रकरणाबाबत विविध माध्यमांतून व सोशल मीडियावर अप्रमाणित माहिती व अफवा पसरवल्या जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच कोणीही खोटी माहिती प्रसारित करत असल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
दरम्यान, महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक, बीड यांच्यामार्फत योग्य पद्धतीने व पारदर्शक कायदेशीर प्रक्रियेनुसार सुरू असून तपासाच्या हितासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची सखोल पडताळणी करण्यात येत असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.








