विनापरवाना वाळू वाहतूक करणारा हायवा पोलिसांच्या ताब्यात.
25 लाखांचा मुद्देमाल जप्त;बीड वाहतूक शाखेची कारवाई.

बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईत बीड जिल्हा वाहतूक शाखेने मोठी कारवाई करत वाळूने भरलेला हायवा जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे २५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
पोलीस हवालदार अजीनाथ विष्णु मुंढे जिल्हा वाहतूक शाखा, बीड यांनी चकलांबा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक ४ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास सपोनि सानप, पोह/२०४७ तांदळे व पोशि/९०२ कदम यांच्यासह अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली.
माहितीनुसार मालेगाव ते उमापूर रोडवरून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा हायवा जाणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला. मौजे मालेगाव ते उमापूर मार्गावरील कॅनॉलजवळ दोन पंचांना बोलावून पोलिसांनी पाहणी सुरू केली.
सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास मालेगावकडून उमापूरकडे जाणारा भारत बेंझ कंपनीचा वाळूने भरलेला हायवा (MH-23 AU-3596) पोलिसांना दिसताच त्याला थांबवून ताब्यात घेण्यात आले. चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव जावेद युसुफ पठाण (रा. महारटाकळी, ता. गेवराई, जि. बीड) असे सांगितले.
पोलिसांनी वाळू वाहतुकीचा परवाना विचारला असता त्याच्याकडे कोणताही अधिकृत परवाना आढळून आला नाही. त्यानंतर पंचांसमक्ष वाहनाची पाहणी केली असता हायवामध्ये सुमारे ६ ब्रास वाळू आढळून आली.भारत बेंझ कंपनीचा हायवा – अंदाजे किंमत २५,००,००० रुपये,६ ब्रास वाळू – अंदाजे किंमत ३०,००० रुपयेअसा एकूण २५,३०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेला हायवा व वाळू पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणली. विनापरवाना वाळू वाहतूक करणारा हायवावर करवाई केल्याने चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी हायवा चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही करवाई बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा सुभाष सानप, पो.हे.मुंडे, पो.हे.तांदळे, पो. हे. कदम यांनी केली.




