विजेचा शॉक लागून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू.
बीड शहरात जागोजागी उघड्या डीपी असल्याने जीवितास धोका,बीड शहरातील गोरे वस्ती येथील दुर्दैवी घटना.

बीड(प्रतिनिधी)बीड शहरातील नगर रोडवरील गोरे वस्ती येथे रविवारी (१५ फेब्रुवारी) सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी घटना घडली. विजेचा जोरदार धक्का बसल्याने १५ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला.
मृत मुलाचे नाव शेख आवेज शेख परवेज (वय १५, रा. गोरे वस्ती) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील डी.पी. (वीज वितरण ट्रान्सफॉर्मर) जवळ गेल्यानंतर तो ट्रान्सफॉर्मरला चिटकला आणि त्याला तीव्र विद्युतप्रवाहाचा धक्का बसला. धक्का इतका जबरदस्त होता की त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटना बीड शहरातील जवळपास सर्वच मुख्य रस्ते तसेच गल्लीबोळात ट्रान्सफार्मर हे उघड्या स्थितीत असून जमिनीपासून काही अंतरावरच असून देखील महावितरण कडून याची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नागरिकात रोष व्यक्त होत आहे. उघड्या डीपी असल्याने मुके जनावर तसेच नागरिकांना यापासून जीवित हानी होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही यामुळे महावितरण ने तात्काळ या दुर्दैवी घटनेची दखल घेऊन शहरातील उघड्या व जमिनीलगत डीपीवर तात्काळ उपायोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.
बालेपिर भागातील गोरे वस्ती येथे घडताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ संबंधित यंत्रणांना माहिती दिली. मृतदेह पुढील तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे समजते.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून विजेच्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.




