शस्त्राचा धाक दाखवून लुटमार करणारा सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या.
बीड शहर पोलिसांची करवाई.

बीड | दि. ५ जानेवारी २०२६ जिल्हा परिषद कार्यालयासमोर शस्त्राचा धाक दाखवून जबरदस्तीने साहित्य लुटणाऱ्या आणि जवळपास एक वर्षापासून हैदराबाद येथे फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला बीड शहर पोलिसांनी अटक केली आहे. सय्यद अनवर सय्यद मुजावर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
दि. १२ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अशोक रोहिदास कांबळे (रा. साखरे बोरगाव, ह.मु. बीड) हे जिल्हा परिषद कार्यालयासमोर पत्र्याच्या शेडचे काम करत होते. त्यावेळी आरोपी सय्यद अनवर व त्याचा साथीदार यासिन खान पठाण (रा. बीड) यांनी तेथे येऊन फरशी कुऱ्हाड व तलवारीचा धाक दाखवत, सुमारे २५ हजार रुपयांचे वेल्डिंग मशीन, कटर मशीन आणि ड्रिल मशीन जबरदस्तीने लुटून नेले होते.
या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. ३२३/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुख्य आरोपी सय्यद अनवर हा गुन्ह्यानंतर हैदराबाद येथे पळून जाऊन पोलिसांना चकवा देत होता. दरम्यान, गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे तो बीडमध्ये आल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून त्याला जिल्हा परिषद परिसरातून ताब्यात घेतले.
त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तो अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असल्याने त्याच्यावर पुढील काळात कडक पोलिस निगराणी (Surveillance) ठेवण्यात येणार आहे.
🚨 पोलिसांचा इशारा
पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉंवत यांच्या सूचनेनुसार बीड शहर पोलीस गुन्हेगारांविरुद्ध कडक मोहीम राबवत आहेत. शहरात दहशत माजवण्याचा किंवा अशा प्रकारचे गुन्हे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉंवत, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. शितलकुमार बल्लाळ, पोलीस उपनिरीक्षक श्री. महेश जाधव व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.




