चारचाकी व ऑटोरिक्षाची समोरासमोर जोराची धडक.
दोघे गंभीर जखमी; जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

बीड (प्रतिनिधी)बीड–परळी रोडवरील बार्शी नाका ते तेलगाव नाका दरम्यान उताराच्या ठिकाणी चारचाकी व ऑटोरिक्षाची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी बीड शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिनांक ४ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. चारचाकी क्रमांक MH 23 Q 1212 ही बार्शी नाक्याकडून तेलगाव नाक्याच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या ऑटोरिक्षाने रॉंग साईडने येत जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की चारचाकी रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघातानंतर काही काळ या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.नागरिकांनी गर्दी केली होती.या घटनेची माहिती मिळताच पेठ बीड पोलीस ठाण्याचे पीएसआय उबाळे,भोले, असलम व सानप यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली तसेच जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, बार्शी रोड ते तेलगाव नाका या संपूर्ण रस्त्यावर वळण जागा (डिव्हायडर/कट) नसल्याने यापूर्वीही अनेक अपघात झाले असून काहींना जीव गमवावा लागला आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तसेच या मार्गावरील विद्युत पुलावरील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरते, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. संबंधित विभागाने तातडीने पथदिवे सुरू करावेत व रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात, व अनेक महिन्यापासून रखडलेले रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.







