वनरक्षकासह एकजण लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.
वन विभागातील लाचखोरी चव्हाट्यावर;नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कारवाईने खळबळ

बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात शासकीय कार्यालयांमध्ये काम करून घेण्यासाठी लाच द्यावी लागत असल्याची नागरिकांची तक्रार सातत्याने समोर येत असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांनंतरही लाचखोरीचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही. अशातच नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बीड एसीबीने मोठी कारवाई करत एका वनरक्षकाला लाच घेताना रंगेहात पकडले आहे.
दिनांक 31 डिसेंबर बुधवार रोजी बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून, 2025 या वर्षातील हा शेवटचा ट्रॅप ठरला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
पाटोदा तालुक्यातील वनपरिक्षेत्रातील वनरक्षक एकमल याने जळावू लाकडाची गाडी चालवू देण्यासाठी हप्ता म्हणून एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच रायमोहा येथील हॉटेल चालक दिगांबर चौधरी याने स्वीकारल्याचे एसीबीच्या कारवाईत उघड झाले आहे.
वन विभागातील लाचखोरी उघड झाली असून या खात्यातील बेड मासे कधी गळाला लागणार? असा प्रश्न पडला आहे.
या प्रकरणी संबंधित दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, ही संपूर्ण कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे.
बीड जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कार्यालयात कामासाठी कोणी जर लाच मागत असेल तर आमच्या कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन बीड लाचलुचपत उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांनी केले आहे.








