नगरसेवकाच्या घरासमोर कोयता दाखवत दहशत करणारे सीसीटीव्हीत कैद !
निकालानंतर कोयता घेऊन फिरत असल्याने दहशतीचे वातावरण.

बीड(प्रतिनिधी) बीड शहरात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकी मध्ये मतदान व निकाला पर्यंत बीड पोलिसांच्या नियोजनामुळे जिल्ह्यात वातावरण शांततेत पार पडले.
नगरपालिका निकाल जाहीर झाले असून अनेक प्रभागांमध्ये अनपेक्षित व धक्कादायक निकाल लागले आहेत. या निकालानंतर काही ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बीड शहरातील धानोरा रोड परिसरात आरती रणजित बनसोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून ‘घडी’ या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यांनी या निवडणुकीत घवघवीत यश मिळवले आहे. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर मध्यरात्री एक गंभीर प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दोनच्या सुमारास दोन तरुण दुचाकीवरून आरती बनसोडे यांच्या घराजवळ आले. त्यांच्या हातात कोयता असल्याचे दिसून आले, तसेच दुचाकीवर जोरजोरात वार करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या घटनेनंतर धानोरा रोड परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. काही नागरिकांकडून “कोयता गँग सक्रिय झाली आहे का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. घटनेमागील नेमका उद्देश काय, तसेच आरोपी कोण आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.
निवडणूक निकालानंतर अशा प्रकारच्या दहशतीच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून अशा दहशत करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे तसेच या पोलिसांनी परिसरात गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.








