ब्रेकिंग न्यूज

अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाचा भीषण अपघात.

चार गंभीर जखमी;तेलगाव-धारूर रस्त्यावर अपघात.

धारूर (बीड) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी तेलगाव–धारूर रस्त्यावर धुनकवड फाट्याजवळ घडली. या अपघातात पती-पत्नी व दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, परभणीहून धारूरमार्गे केजकडे जात असताना उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील ऑक्सिजन टँकर गाडी (MH 02 GH 5732) ने समोरून येणाऱ्या दुचाकी (MH 44 V 1518) ला जोरदार धडक दिली. वाहन निष्काळजीपणे आणि वेगाने चालविल्यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

या भीषण अपघातात भोगलवाडी येथील विष्णू सुदे, त्यांच्या पत्नी कुसुम सुदे आणि दोन लहान मुली गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तत्काळ धारूर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले व तेथून अंबाजोगाई येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले.

घटनेनंतर काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. ताफ्यातील वाहनांच्या वेगा बाबत परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली असून, सामान्य कुटुंबावर आलेल्या या संकटा बद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पोलीसांनी अपघातग्रस्त दोन्ही वाहने ताब्यात घेतली असून, चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

तेलगाव-धारूर रस्ता धोकादायकच — पुन्हा उचलला प्रश्न पूर्वीपासूनच हा रस्ता अत्यंत धोकादायक झाल्याची तक्रार स्थानिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे केली होती. मात्र, कोणतीही उपाययोजना न झाल्याचा संताप नागरिकांमध्ये आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button