स्वस्तात विमान तिकीटे देतो म्हणून युवकाला २५ लाखाला फसवले !
एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात;बीड शहर डीबी पथकाची कारवाई.

बीड – “स्वस्तात विमानाची तिकिटे काढून देतो” असा विश्वास बसवून तब्बल ₹२५ लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला बीड शहर डीबी पथकाने लोणावळा (जि. पुणे ग्रामीण) येथून अटक केली आहे. या कारवाईनंतर पोलिसांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
तक्रारदार अण्णासाहेब गोटीराम राठोड यांचा मुलगा विदेशात शिक्षणासाठी आहे. त्याच्या येण्या-जाण्यासाठी स्वस्तात विमानाची तिकिटे मिळवून देतो अशी बतावणी आरोपी कुणाल भाऊसाहेब चव्हाण (वय 29, रा. चासनळी, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) याने केली. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराकडून आरोपीने ₹२५,००,००० इतकी रक्कम घेतली.
यानंतर आरोपी फरार झाला होता. बराच काळ कोणताही ठावठिकाणा लागत नसल्याने तक्रार बीड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.
तांत्रिक तपासातून आरोपीचा शोध :
गुन्हा दाखल होताच बीड शहर पोलीसांनी आरोपीचा शोध सुरू केला.
तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि सततच्या पाठपुराव्यामुळे डीबी पथकाने आरोपी लोणावळा (पुणे ग्रामीण) येथे असल्याचा ठावठिकाणा लावला व सापळा रचून त्याला अटक केली.
कारवाईत सहभागी अधिकारी :
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या निर्देशाने,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा पवार यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.
अभियानाचे नेतृत्व पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी केले.कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव, गहिनाथ बावनकर, राम पवार यांनी विशेष मेहनत घेतली.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन :
“स्वस्तात विमानाची तिकीट”, “परदेशात नोकरी”, “माल स्वस्तात देतो” अशा कोणत्याही आमिषावर विश्वास ठेवू नये.
मोठी रक्कम देण्यापूर्वी व्यक्तीची व व्यवहाराची पूर्ण खात्री करूनच पैसे द्यावेत.फसवणूक संशयित वाटल्यास किंवा कोणी प्रलोभन दाखवत असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन बीड पोलिसाकडून करण्यात आले आहे.







