बीड नगरपालिका निवडणूक : अर्ज छाननी पूर्ण;अर्ज मागे घेण्यासाठी तीन दिवस.
नगरसेवसाठी तब्बल 607 तर नगराध्यक्ष 30 उमेदवार शर्यतीत.

बीड( प्रतिनिधी)बीड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया काल (१८ नोव्हेंबर) रात्री उशिरा आठ वाजेपर्यंत पार पडली. यामध्ये मोठ्या संख्येने अर्ज अवैध ठरल्याचे चित्र समोर आले असून अंतिम यादीनुसार नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदांसाठी एकूण 607 अर्ज वैध ठरले आहेत.
नगराध्यक्षपदासाठी 47 अर्जांपैकी 30 वैध तर 17 अर्ज अवैध ठरले. नगराध्यक्ष पदासाठी यंदा मोठी चुरस पाहायला मिळाली असली तरी छाननीत अनेकांचे अर्ज बाद झाले.
नगरसेवक पदासाठी एकूण 775 अर्जांची छाननी करण्यात आली. त्यापैकी 577 अर्ज वैध ठरले तर 198 अर्ज अवैध ठरले आहेत.
बीड नगरपालिका निवडण्यासाठी नगरसेवक पदासाठी एकूण 822 नामनिर्देशन अर्जांपैकी 607 अर्ज वैध ठरले तर 215 अर्ज अवैध ठरल्याचे निवडणूक विभागाने कळवले आहे.
छाननीनंतर अर्ज मागे घेण्यासाठी आता तीन दिवसांची मुदत उमेदवारांकडे आहे. या कालावधीत स्वतःहून माघार घेतलेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार असून त्यानंतरच प्रत्येक प्रभागातील खरी निवडणूक लढत स्पष्ट होणार आहे.
बीड नगरपरिषद निवडणुकीचा ताप वाढत असताना वैध-अवैध अर्जांचे प्रमाण लक्षवेधी ठरले असून आगामी काही दिवसात राजकीय गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







