नगरपालिका कार्यालयात इच्छुकांची मोठी गर्दी.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्याने गर्दी.

बीड (प्रतिनिधी) – बीड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या दि. १७ नोव्हेंबर हा शेवटचा दिवस असल्याने आजपासूनच नगरपालिका कार्यालयात इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
आज रविवारची सुट्टी असतानाही, निवडणूक आयोगाने ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमांतून अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे सकाळपासूनच बहुतांश टेबलांवर उमेदवारांची रांग लागली. अनेकांनी तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी आजच अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. उमेदवार कागदपत्राची झुळझुळ करण्यासाठी धावपळ करताना दिसून येत होते.
दरम्यान, उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून शेवटच्या दिवशी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवीन राजकीय समीकरणे तयार होण्याची चिन्हे दिसत असून अनेक इच्छुक “वेट अँड वॉच”च्या भूमिकेत आहेत. कारण सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची घोषणा अद्याप केलेली नाही. त्यामुळे उद्याच मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता असून नगराध्यक्ष आणि नगरसेवक या दोन्ही पदांसाठी इच्छुकांची एकच धावपळ सुरू होणार आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत कोणता पक्ष कोणत्या उमेदवारावर विश्वास ठेवणार? कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय वातावरण मात्र दिवसेंदिवस तापत असून आगामी नगरपरिषद निवडणूक त्रिशंकू व अधिक रंगतदार होण्याचे संकेत मिळत आहेत.







