गाळ्यात आढळली कोटींची चारचाकी व मशिनरी ! गाळा मालक चकित !
महागडी गाडी कुटेची असल्याची चर्चा,बीड ग्रामीण पोलिसांचा तपास सुरू.

गाळा मालकाला नव्हती माहिती; लॉक तोडून आत पाहिल्यावर दिसली महागडी गाडी व यंत्रसामग्री.
बीड(प्रतिनिधी)बीड शहरा नजीक बहिरवाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समिती परिसरात असलेल्या एका गाळ्यामध्ये कोटी रुपयांची महागडी चारचाकी गाडी आणि मशिनरी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या गाळ्यातील गाडी व मालाबाबत गाळा मालकाला काहीच माहिती नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बहिरवाडी भागात बाजार समिती मधील गाळा क्रमांक 109 चे गाळा मालकानी बऱ्याच दिवसांनी आपला गाळा(गोडाऊन) उघडण्यासाठी गेला असता लॉकमध्ये चावी लागत नसल्याने त्याने अनेक प्रयत्न करून देखील लॉक उघडत नसल्याने ग्लेंडर कटरने लॉक तोडले. शटर उघडून आत पाहिले असता त्याला आत एक चारचाकी गाडी आणि विविध मशिनरी, यंत्रसामग्री व कपडे ठेवलेली दिसल्याने हा प्रकार पाहून तो चकित झाला.
गाळा मालकाने तत्काळ बीड ग्रामीण पोलिसांना याबाबाद माहिती देत घडलेला प्रकार सांगून लेखी अर्ज सादर केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गाळ्याची पाहणी केली. प्राथमिक तपासात चारचाकी गाडीची किंमत सुमारे एक कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे समोर आले आहे. गाडीमध्ये काही कपडे व साड्याही असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
बीड ग्रामीण पोलीस निरीक्षक अशोक मोदीराज यांनी मोंढा परिसरात जाऊन गाळ्याची तपासणी केली. त्या ठिकाणाचा पंचनामा केला या गाडीचा आणि मशिनरीचा मालक कोण, तसेच गाळा मालकाच्या परवानगीशिवाय हे सर्व साहित्य गाळ्यात का व कोणी ठेवले?याचा तपास पोलिस करत आहेत.तसेच ही गाडी एखाद्या गुन्ह्यात वापर झाला आहे का? यासाठी तपास पोलीस करत आहेत
या घटनेमुळे बाजार समिती परिसरात मोठी चर्चा सुरू असून, ही चारचाकी गाडी कुणाची आणि ती येथे कोणी व कशासाठी ठेवण्यात आली होती,याचे गूढ उकलण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एक कोटीची गाडी ही कुटेची असल्याची चर्चा दबक्या आवाजात रंगली असून, पोलीस गाडीच्या चेसी नंबर, इंजिन नंबर वरून गाडी मालकाचा शोध घेत आहेत.










