ब्रेकिंग न्यूज

जबरी चोरी प्रकरणी चार आरोपी अटकेत.

बीड स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई;मोबाईल व दुचाकी जप्त.

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – अंबाजोगाई शहरात ऑनलाईन पैसे टाकण्याच्या बहाण्याने युवकास मोटारसायकलवर बसवून जबरी चोरी करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेला मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी फिर्यादी शेख इम्रान दस्तगीर (वय 28, रा. होळ ता. केज) यांनी पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर येथे 7 फेब्रुवारी 2026 रोजी तक्रार दाखल केली होती. फिर्यादी हे आडस फाटा येथील सानिका बिअर बारसमोर थांबले असताना तिघेजण मोटारसायकलवर आले. “ऑनलाईन पैसे टाकतो” असे सांगून त्यांनी फिर्यादीस आडस रोडकडे नेले व त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळ काढला.

तक्रारीवरून गु.र. नं. 48/2026 कलम 309(4), 3(5) बीएनएसप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला. 26 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सुमित अरुण गायकवाड (वय 20), विनय गोविंद जगधने (वय 19), विश्वजीत विश्वास गंडले (वय 19) व शिवम जनक कसबे (वय 19, सर्व रा. अंबाजोगाई) यांना अंबाजोगाई शहर परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करून पुढील तपासासाठी अंबाजोगाई शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई नवनित काँवत (पोलीस अधीक्षक, बीड), चेतना तिडके (अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई) व शिवाजी बंटेवाड (स्थानिक गुन्हे शाखा, बीड) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, हवालदार मारोती कांबळे, रामचंद्र केकाण, गोविंद भताने, सचिन आंधळे, विकी सुरवसे व चालक अतुल हराळे यांचा सहभाग होता.

अंबाजोगाई शहरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी सतर्कता वाढविली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button