ब्रेकिंग न्यूज

हरवलेल्या अल्पवयीन मुलीचा काही तासांत लावला शोध.

पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ व बीड शहर पोलिसांची तत्परता.

बीड (प्रतिनिधी) : बीड शहर पोलीस ठाणे हद्दीतील एका अल्पवयीन मुलीने क्लासेसमधून निघून गेल्याची तक्रार समोर येताच पोलिसांनी तात्काळ याची गंभीर दखल घेत शोधमोहीम हाती घेतली. जलद हालचाली, तांत्रिक तपास आणि स्थानिक पातळीवरील समन्वय यांच्या जोरावर पोलिसांनी अल्पावधीतच मुलीचा सुरक्षित शोध लावला. त्यानंतर संबंधित मुलीला सुखरूपपणे तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

या कारवाईमुळे संभाव्य अनर्थ टळला असून, शहर पोलिसांच्या तत्परतेबद्दल पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी वेळ न दवडता विविध ठिकाणी चौकशी, माहिती संकलन आणि आवश्यक पडताळणी करत मुलीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.

दरम्यान, तपासात असेही आढळून आले की काही अल्पवयीन मुली सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात येत आहेत. अशा संपर्कातून फूस लावणे किंवा पळवून नेण्यासारख्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालकांनी अधिक जागरूक राहणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

पोलिसांचे आवाहन
पालकांनी आपल्या मुला-मुलींच्या मोबाईल वापरावर व त्यांच्या संपर्कांवर लक्ष ठेवावे. मुलांशी सतत संवाद साधून त्यांना विश्वासात घ्यावे. कोणतेही संशयास्पद चॅटिंग, फोन कॉल किंवा वर्तन आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच शाळा, महाविद्यालये व क्लासेसचे संचालक आणि शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या हालचालींबाबत सतर्क राहून आवश्यक ती माहिती वेळेवर द्यावी.

वेळीच माहिती मिळाल्यास अनुचित घटना टाळता येतात आणि प्रतिबंधात्मक कारवाई करणे शक्य होते. गैरवर्तन करणाऱ्या व समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पोलिसांची कारवाई सुरूच असून, या मोहिमेत पालक, शिक्षक आणि नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

या घटनेतून सतर्कता आणि समन्वय किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, डी वाय एस पी पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ,पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव, पोलीस अंमलदार गहिनीनाथ बावनकर, मंगेश शिंदे, राम पवार, इलियास शेख, बापू गायकवाड या शोध मोहिमेत सहभागी होते.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button