गांजा साठ्यावर छापा.
स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, ९.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त.आरोपी ताब्यात.

बीड (प्रतिनिधी)परळी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील धर्मपुरी येथे राहत्या घरात गांजाची साठवण व विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर बीड स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत तब्बल २०१ किलो ३४० ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत ९ लाख ७७ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मुख्य आरोपी बाबुलाल उर्फ बबलू भतार (रा. धर्मपुरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार धर्मपुरी येथील एका राहत्या घरात गांजाची साठवण करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता घरातून मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. पोलिसांनी २०१ किलो ३४० ग्रॅम वजनाचा गांजा ताब्यात घेतला.
या प्रकरणी पोलिसांनी ९,७७,३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान बाबुलाल उर्फ बबलू भतार याला अटक करण्यात आली असून इतर संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम, शिवाजी बंटेवाड स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या धडक कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.







