ब्रेकिंग न्यूज

बार्शी नाका रेल्वे ब्रिजजवळील खड्डा म्हणजे”मौत का कुवा”

बसचे टायर अडकल्याने तासभर वाहतूक ठप्प;अपघाताचा धोका वाढला.

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून रेल्वे रुळाचे काम प्रगतीपथावर असले, तरी अनेक ठिकाणी रेल्वे ब्रिजची कामे रखडल्याचे चित्र दिसून येत आहे. याकडे संबंधित रेल्वे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेषतः बार्शी रोडवरील बार्शी नाका परिसरातील गोरे वस्ती जवळील रेल्वे ब्रिजलगत पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

धुळे–सोलापूर मार्गावरील बार्शी नाक्यापासून पहिल्याच रेल्वे ब्रिजजवळ रस्त्यात मागील दोन महिन्यापासून गुडघाभर खड्डा पडला असून, या खड्ड्यात अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाल्याच्या घटना घडल्याचे स्थानिकांनी सांगितले. दिवसा हा खड्डा दिसून येत असला, तरी रात्रीच्या वेळी वाहनचालकांना तो लक्षात न आल्याने मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, गुरुवार (दि. 11 जून) रोजी सायंकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास याच खड्ड्यात एका बसचे पुढील टायर अडकल्याने वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि जवळपास एक तास वाहतूक कोंडी निर्माण झाली. स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

शहरासह परिसरात विविध रस्ते आणि रेल्वे संबंधित कामे सुरू असताना सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. रेल्वे ब्रिजवर हा धोकादायक खड्डा तातडीने बुजवण्यात यावा, अन्यथा रेल्वे अधिकाऱ्यांची वाहने अडवून याच ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा क्षत्रिय जाणता राजा युवा प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात आला आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button