भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थ विरोधात कारवाईसाठी अन्न व औषधं प्रशासन सज्ज.
दुध भेसळखोरांची माहिती टोल फ्री क्रमांकावर द्या;तुकाराम मुंढे ॲक्शन मोडवर.

राज्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांमधील वाढत्या भेसळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कारवाईची तयारी सुरू असताना नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दूध, पनीर, तूप, बटर, लस्सी, थंड पेय यांसारख्या पदार्थांमध्ये होणारी भेसळ ही केवळ फसवणूक नसून ती थेट आरोग्याशी खेळ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
तुकाराम मुंढे यांनी FDA आयुक्त पदभार स्वीकारताच भेसळखोरा विरोधा अनेक धडाकेबाज कारवाया केल्या आहेत यामुळे राज्यात किती मोठ्या प्रमाणात दूध व दूध जन्य पदार्थात भेसळ होत आहे याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना भेसळयुक्त दूध अधिक घातक ठरू शकते. काही ठिकाणी दुधामध्ये पाणी, स्टार्च, डिटर्जंट, युरिया, सिंथेटिक रसायने, साबण, ग्लुकोज, रिफाइंड तेल किंवा इतर रासायनिक पदार्थ मिसळल्याच्या तक्रारी समोर येत असतात. या भेसळीमुळे शरीरावर गंभीर विपरीत परिणाम होऊ शकतात.
भेसळयुक्त दुधामुळे होणारे संभाव्य दुष्परिणाम :
किडनी व यकृतावर परिणाम – युरिया किंवा रासायनिक भेसळयुक्त दूध दीर्घकाळ सेवन केल्यास मूत्रपिंड व यकृतावर ताण येऊ शकतो.
लहान मुलांच्या वाढीवर परिणाम – पौष्टिकतेचा अभाव झाल्याने मुलांची शारीरिक व मानसिक वाढ प्रभावित होऊ शकते. तसेच मुलांच्या व महिलांच्या मध्ये कॅन्सर सारखा महाभयंकर रोगाची लागण देखील होण्याची शक्यता.
प्रतिकारशक्ती कमी होणे – निकृष्ट व भेसळयुक्त पदार्थांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते.
गंभीर आजारांचा धोका – काही हानिकारक रसायनांचा दीर्घकाळ संपर्क आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतो आणि काही प्रकरणांत कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करतात.
दरम्यान, प्रशासनाकडून नागरिकांना संशयास्पद दूध संकलन केंद्रे, भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ लस्सी,खवा, तेल, तूप, पनीर,किंवा अनियमित हालचालींची माहिती अधिकृत टोल फ्री क्रमांक व ई-मेलवर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीनंतर भेसळखोरांविरोधातील कारवाईला वेग येईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत असून, “आपल्या लेकरबाळांच्या आरोग्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहून संशयास्पद प्रकारांची माहिती 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर द्यावी,” असे आवाहन अन्नसुरक्षा विभागाकडून करण्यात येत आहे.







