चकलांबा व माजलगाव घरफोडी प्रकरणातील आरोपी जेरबंद.
तीन चोरटे ताब्यात;बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

बीड( प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील विविध घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असून, चकलांबा व माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यांतील घरफोडीचे दोन महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
चकलांबा येथील सुरज बियर बार मध्ये अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता याप्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 167/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 305 व 331(4) नुसार दाखल गुन्ह्यात गेवराई रोडवरील सूरज बिअर बार अँड परमिट रूम येथे अज्ञात चोरट्यांनी खिडकी तोडून विविध कंपनीच्या दारूच्या बाटल्या व गल्ल्यातील रोख रक्कम चोरून नेली होती.
या प्रकरणाचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान, आरोपी चकलांबा रोडमार्गे गेवराईकडे येत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर महार टाकळी परिसरात सापळा रचून कार्तिक विरसिंग नागपुरे (रा. मुंढवा, पुणे), आदित्य मयूर जाधव (रा. मांजरी, पुणे) व हर्षवर्धन मोहन रेड्डी (रा. केशवनगर, पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांचा सदर गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांनी इतर साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपासासाठी आरोपींना चकलांबा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दरम्यान, माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 153/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 331(4) अन्वये दाखल घरफोडी प्रकरणाचाही तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता. तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती व स्थानिक तपासाच्या आधारे एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चौकशीदरम्यान चोरीस गेलेला सुमारे 80 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून, सदर घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, प्रभारी पोलिस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम, अपर पोलीस अधीक्षक बीड समीर शेख तसेच स्थानिक गुन्हे शाखा पो.नि.शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महेश विघ्ने, पो.ह जोगदंड, पो.ह पठाण, पो.ह गित्ते, पो.ह घोडके व पो.ह मराडे यांनी केलेली आहे तसेच चकलांबा येथील कारवाई पोउपनि श्री श्रीराम खटावकर, पोउपनि श्री शेखर औटे, पोह राहुल शिंदे, पोह आनंद मस्के, पोअ बबन सलगर, पोअ अशफाक सय्यद, पोअ अश्विनकुमार सुरवसे, चापोअ सिद्धेश्वर मांजरे यांनी केलेली आहे.







