बीडमध्ये पुन्हा चैन स्नॅचिंग; शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत तिसरी घटना
गेल्या दोन महिन्यांतील ही तिसरी घटना

बीड (प्रतिनिधी) – शहरात सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीचा पुन्हा एकदा धुमाकूळ पाहायला मिळाला असून शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत चैन स्नॅचिंगची आणखी एक घटना घडली आहे. गेल्या दोन महिन्यांतील ही तिसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गीता पुरुषोत्तम भोसले (वय 38, रा. शिवाजी धांडे नगर, शंभुराजे नगर, बीड) या आपल्या कुटुंबासह राहत असून 25 जानेवारी 2026 रोजी रात्री सुमारे 8.30 वाजता त्या पती व मुलासह रिलायन्स स्मार्ट बाजार येथे किराणा सामान खरेदीसाठी गेल्या होत्या.
रात्री सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास खरेदी करून त्या स्कुटीवर मुलासह तर पती दुसऱ्या दुचाकीवरून घरी परतत होत्या. त्या जालना रोडवरून बार्शी रोडकडे जात असताना द्वारकादास शामकुमार दुकानासमोर मागून एका युनिकॉर्न मोटारसायकलवरून दोन अज्ञात इसम दुचाकीवर आले. त्यांनी गीता भोसले यांच्या गळ्यातील सुमारे 14 ग्रॅम वजनाचे व अंदाजे 78 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे नगर रोडच्या दिशेने पळ काढला.
घटनेनंतर भोसले व त्यांच्या मुलाने स्कुटीवरून संशयितांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले. आरोपींच्या अंगावर काळ्या रंगाचे कपडे होते तसेच त्यांनी चेहऱ्यावर मफलर बांधले होते, अशी माहिती फिर्यादीने दिली आहे.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत.
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांत शिवाजीनगर हद्दीत चैन स्नॅचिंगच्या तीन घटना घडल्याने पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून “डीबी पथक फक्त नावालाच आहे का?” असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पोलीसांनी तातडीने गस्त वाढवून आरोपींचा शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.











