महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली;परंतु मृत्यूचे गूढ कायम..
हत्या की नैसर्गिक मृत्यू? हाताच्या बोटावरून ओळख पटली.डीएनए नमुने घेतले.

बीड (प्रतिनिधी) बीड शहराजवळील पालवण शिवारात २६ जुलै रोजी कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाची अखेर ओळख पटली आहे. हा मृतदेह सुमन उर्फ संताबाई गणपत मोरे (वय ६५, रा. नूर कॉलनी, गांधीनगर, बीड) यांचा असल्याचे समोर आले असून, या प्रकरणात हत्या की नैसर्गिक मृत्यू? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नसून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
मृतदेह चार ते पाच दिवसांपासून पडून असल्याचा संशय असून तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. मृत महिलेच्या हाताचे एक बोट नसल्याच्या वैशिष्ट्यावरून पोलिसांनी ओळख पटविण्याचा धागा मिळवला. त्यानंतर मंगळवारी (२८ जुलै) सकाळी महिलेचा मुलगा,नातेवाईक बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि मृतदेहाची ओळख निश्चित झाली.
दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी तज्ज्ञांकडून डीएनए तपासणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. तसेच घटनास्थळावरील विविध पुरावे आणि संशयित वस्तूंचीही तपासणी सुरू आहे.
या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित महिला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ (मतिमंद) असल्याची माहिती समोर येत असली, तरी तिचा मृतदेह शहरापासून दूर पालवण शिवारात कसा पोहोचला, हा तपासाचा महत्त्वाचा मुद्दा आहे. मृतदेह ज्या गादीवर आढळला ती गादी नवीन असल्याचेही प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. त्यामुळे मृतदेह अन्य ठिकाणाहून कोणी आणून टाकला आहे?याचाही तपास सुरू आहे.
ग्रामीण पोलीस घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, स्थानिकांची चौकशी तसेच नातेवाईकांकडून माहिती घेत आहेत. मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात ? मृत्यू नैसर्गिक आहे तर मृतदेह बीड शहराबाहेर निर्जळ स्थळी कसा? मृतदेह नवीन गादीवरच कसा? असे एक ना अनेक प्रश्न उद्भवत असून याबाबतचा निष्कर्ष शवविच्छेदन, फॉरेन्सिक अहवाल आणि डीएनए तपासणीनंतरच स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.









