ब्रेकिंग न्यूज

प्लास्टिकच्या कपात चहा दिल्यास हॉटेलचा परवाना रद्द.

दूध,तेल भेसळखोरासह गुटखा माफिया FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या रडारवर.

बीड(प्रतिनिधी)FDA आयुक्त पदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यापासून भेसळखोरावर कारवायात वाढ झाली असल्याचे दिसत आहे.

प्लास्टिक किंवा फायबरच्या ‘यूज अँड थ्रो’ कपांमध्ये गरम चहा व इतर गरम पेये देणाऱ्या हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या आणि खाद्यव्यवसायिकांवर आता कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदी नियुक्तीनंतर तुकाराम मुंढे यांनी अन्नसुरक्षा नियमांच्या कठोर अंमलबजावणीवर भर दिला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आवश्यकतेनुसार परवाना रद्द करण्याची कारवाई होऊ शकते, असा इशारा दिला आहे.

 विविध जिल्ह्यात आतापर्यंत दूध, तेल, तूप, पनीर,खवा, बेकरी यांसारख्या पदार्थांवरील कारवायांनंतर आता प्लास्टिकच्या कपात गरम पेये देण्याच्या प्रकाराकडेही FDA ने लक्ष केंद्रित केले आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गरम चहा किंवा कॉफी प्लास्टिकच्या कपात घेतल्यास उष्णतेमुळे सूक्ष्म प्लास्टिक कण (मायक्रोप्लास्टिक्स) आणि काही हानिकारक रसायने पेयामध्ये मिसळू शकतात. दीर्घकाळ अशा पेयांचे सेवन केल्यास हार्मोन्सचे असंतुलन, पचनसंस्थेचे विकार, यकृत व मूत्रपिंडांवर परिणाम तसेच कर्करोगाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काचेचे ग्लास, स्टेनलेस स्टीलचे कप किंवा मातीचे कुल्हड यांसारख्या सुरक्षित पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण होण्यासोबतच पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे. दरम्यान, अन्नसुरक्षेबाबत किंवा भेसळीसंदर्भात नागरिकांनी तक्रारी करण्यासाठी FDA ने टोल-फ्री हेल्पलाइन 1800222365 असा उपलब्ध करून दिली असून, नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी आणि माहिती प्राप्त होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button