बसमध्ये जागा पकडण्याच्या घाईत प्रवासी चाकाखाली.
अंबाजोगाई बसस्थानकात दुर्दैवी मृत्यू.

बीड(प्रतिनिधी) अंबाजोगाई बसस्थानकात बसमध्ये जागा मिळवण्याच्या घाईत धावत गेलेल्या एका प्रवाशाचा बसच्या चाकाखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई बसस्थानकातून एसटी बस बाहेर पडत असताना काही प्रवासी बसमध्ये चढण्यासाठी धावत होते. यावेळी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील ढळेगाव येथील रहिवासी बालाजी देवकाटे हे बस पकडण्याच्या प्रयत्नात धावत असताना त्यांचा अचानक तोल गेला. ते बसच्या मागील चाकाजवळ पडल्याने चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, काही अधिकाऱ्यांनी प्राथमिक स्तरावर हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता व्यक्त केली असली, तरी नेमके कारण काय होते याचा तपास सुरू आहे. बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण घटना कैद झाली असून पोलिस व संबंधित यंत्रणा त्याची पडताळणी करत आहेत.
या घटनेनंतर बसस्थानकांवरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, बस पकडण्यासाठी धावाधाव न करता सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.







