ब्रेकिंग न्यूज

दहशत माजवणाऱ्या दादा-समाधान खिंडकर बंधूवर MPDA.

SP नवनीत कॉवत यांची मोठी कारवाई;खिंडकर बंधुची हर्सूल कारागृहात रवानगी, गुन्हेगारी वर्तुळात खळबळ.

बीड, दि. २६ (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात दहशत निर्माण करून सामाजिक शांतता भंग करणाऱ्या सराईत गुन्हेगार दादा खिंडकर आणि समाधान खिंडकर या बंधूंवर बीड पोलिसांनी मोठी कारवाई करत त्यांना एमपीडीए (Maharashtra Prevention of Dangerous Activities Act) अंतर्गत स्थानबद्ध केले आहे. पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या प्रस्तावास जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी मंजुरी दिल्यानंतर शुक्रवारी रात्री दोघांना अटक करून हर्सूल मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी करण्यात आली.

 दादा आणि समाधान खिंडकर या सख्या भावाविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये मारामारी, गंभीर दुखापत, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे, खंडणी उकळणे तसेच सार्वजनिक शांततेचा भंग करणे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मागील महिन्यातच या भावामध्ये हाणामारी करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते, त्यांच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. कायदेशीर पडताळणीनंतर मंजुरी मिळताच विशेष मोहीम राबवून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांची हर्सूल मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धतेसाठी रवानगी करण्यात आली.

यापुढे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची गुंडगिरी, दहशत किंवा बेकायदेशीर कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत. सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असून सराईत गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए तसेच मोक्का कायद्यांतर्गत कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिला आहे.

MPDA कारवाईमुळे खिंडकर बंधूंना मोठा धक्का बसला असून, जिल्ह्यातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच जिल्ह्यात दहशत, गुंडगिरी करणाऱ्या इतर गुन्हेगारांवर देखील कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिला आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button