ब्रेकिंग न्यूज

दिवसाढवळ्या महिलांच्या हातातील मोबाईल हिसकावणारी टोळी जेरबंद.

नऊ मोबाईल जप्त,तीन सराईत आरोपी अटकेत,शिवाजी नगर पोलिसांची कारवाई.

बीड शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत दिवसाढवळ्या महिलांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या टोळीला शिवाजीनगर पोलिसांच्या डीबी पथकाने अवघ्या दोन तासांत जेरबंद केले. महिलांना लक्ष्य करत सलग तीन ठिकाणी मोबाईल चोरी करणाऱ्या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून नऊ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

माहितीनुसार, रविवारी (दि.14) सकाळच्या सुमारास तीन मोटरसायकलस्वार चोरट्यांनी शिवाजीनगर परिसरात महिलांना लक्ष्य करत धुमाकूळ घातला. पहिल्या घटनेत अश्विनी कृष्णा सुर्वे या दीप हॉस्पिटलकडे जात असताना स्वराज्य नगर कमान परिसरात फोनवर बोलत असताना त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावण्यात आला.

त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत दुसरी घटना घडली. मिराबाई बाळू मुळीक या आपल्या मैत्रिणींसह सरस्वती विद्यालयासमोरून जात असताना त्यांच्या हातातील मोबाईल पाठीमागे बसलेल्या चोरट्याने हिसकावून नेला.

तिसऱ्या घटनेत के. एस. के. कॉलेज परिसरात एका नर्स महिलेच्या एप्रनच्या खिशातील मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. सलग 15 ते 20 मिनिटांच्या अंतराने घडलेल्या या घटनांमुळे पोलिसांसमोर आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर डीबी पथकाने तातडीने पाच स्वतंत्र पथके तयार केली. तसेच दोन ठिकाणी नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरू केला. अखेर अवघ्या दोन तासांत तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आवेश खान खाजा शेख (वय 22, रा. कानडी रोड, केज), गणेश श्रीराम मुंडे (रा. किल्ले धारूर, बीड) आणि ऋषिकेश लक्ष्मण वायबसे (वय 19, रा. कासारी, ता. केज) यांचा समावेश आहे.

पोलीस चौकशीत आरोपींनी महिलांना लक्ष्य करून मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून एकूण नऊ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. हे तिन्ही आरोपी अभिलेखावरील गुन्हेगार असून मोबाईल चोरी करून त्यांचे स्पेअर पार्ट विकण्याचा त्यांचा प्रकार असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

सध्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून इतर चोरीच्या मोबाईल संदर्भात तक्रारी आल्यानंतर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. टोळी स्वरूपात चोरी केल्याने नव्या कायद्यांतील कठोर कलमे लावून न्यायालयात भक्कम पुरावे सादर करण्यासाठी पोलीस पाठपुरावा करणार असल्याचे सांगण्यात आले.

ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकट राम आणि पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी दीपक लंके, पीएसआय काटकर, पीएसआय सागर सोन्ने,रवी आघाव,ज्ञानेश्वर मराडे,Pc सचिन आगलावे,Pc अशोक राडकर,Pc दिलीप राठोड,Pc अनिल घटमाळ,Pc शुभम सोनवणे यांनी केली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button