हनुमान मूर्ती विटंबना प्रकरणी आरोपी ताब्यात.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई;नियोजित आंदोलनापूर्वी पोलिसांना यश

बीड (प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील ब्रम्हगाव येथील मारुती मंदिरातील हनुमान मूर्ती विटंबना प्रकरणी बीड स्थानिक गुन्हे शाखेने एका समाजकंटकास ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे गावात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि हिंदू संघटनांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर बीड स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सखोल तपास करत ही कारवाई केली.
शनिवार, ३० मे २०२६ रोजी ब्रम्हगाव येथील मारुती मंदिरातील हनुमान मूर्तीवर मटन (मांस) चिकटवून धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार उघडकीस आला होता. पहाटे दर्शनासाठी गेलेल्या ग्रामस्थांना हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेनंतर गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी संशयितांविरोधात तातडीने कारवाईची मागणी केली होती. तसेच आरोपींना अटक न झाल्यास संतप्त भक्त व ग्रामस्थांनी आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला होता.
दरम्यान हिंदू संघटना तसेच टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष राकेश जाधव यांनी ब्रम्हगाव येथील हनुमान मंदिरात जाऊन महाआरती करत दोषींना तातडीने अटक करण्याची मागणी केली होती. हिंदू सकल समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजनही करण्यात आले होते.
मात्र, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा सखोल व खोलवर तपास सुरू ठेवत ११ जून रोजी रात्री एका समाजकंटकास ताब्यात घेतले आहे. सध्या संबंधिताची चौकशी सुरू असून या घटनेमागील नेमके कारण व इतर संबंधित बाबींचा तपास पोलीस करत आहेत.
ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, प्रभारी पोलिस अधीक्षक चेतना तिडके मॅडम, शिवाजी बंटेवाड पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा, श्रीराम खटावकर पोलीस उपनिरीक्षक,पो. हे.मनोज वाघ, पो. मनोज परजणे, पो. अशपाक सय्यद या सह स्थानिक गुन्हे शाखेने केली असून, आरोपीविरोधात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.







