ब्रेकिंग न्यूज

आणखी एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात.

सौर पंपाच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी लाच स्विकारताना रंगेहात ताब्यात

 

बीड | प्रतिनिधी : बीड जिल्ह्यात शासकीय कार्यालयांतील लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) सातत्याने कारवाया होत असताना, सौर पंप योजनेसाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या एका वरिष्ठ तंत्रज्ञाला बीड एसीबीने रंगेहाथ पकडल्याने पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा अश्रूबा पाळवदे (वय ३३) हे तेलगाव उपकेंद्र येथे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदाराचे सौर पंप योजनेसाठी नाव मंजूर झाले होते. मात्र, स्थळ पाहणी करून ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी आरोपीने एक हजार रुपयांची मागणी केल्याचे समोर आले.

याप्रकरणी तक्रारदाराने बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार नोंदवली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने चिंचाळा येथे सापळा रचला. त्यावेळी आरोपी कृष्णा पाळवदे हे तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान कवडे, अंमलदार पांडुरंग काचगुंडे, अनिल शेळके, अविनाश दळवी तसेच चालक गणेश म्हेत्रे यांच्या पथकाने केली.

या प्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यात विविध शासकीय कामांसाठी नागरिकांकडून पैशांची मागणी केल्याच्या तक्रारी वाढत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांत एसीबीने केलेल्या कारवायांमुळे अनेक प्रकरणे उघडकीस आली असून, लाचखोरीचे वाढते प्रमाण प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या मागण्यांना बळी न पडता थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button