ब्रेकिंग न्यूज

बीड बसस्थानक आहे की चोरांचा अड्डा?

दिवसाढवळ्या महिलेच्या पर्समधून आठ लाखाचे सोन चोरीला;प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण.

बीड ( प्रतिनिधी)बीड शहरातील बसस्थानक परिसरात दिवसाढवळ्या महिलेच्या पर्समधून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना गुरुवारी (दि. 14 मे) दुपारी घडली. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सविता दत्तात्रय ढगे (रा. कासार जवळा, ता. जिल्हा लातूर) या जालना येथे जाण्यासाठी बीड बसस्थानकात आल्या होत्या. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्या बसस्थानकात थांबल्या होत्या. सायंकाळी 4:15 वाजता बस आल्यानंतर बसमध्ये चढताना त्यांनी पर्स तपासली असता त्यामधील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

चोरी झालेल्या दागिन्यांमध्ये मिनी गंठण, तीन अंगठ्या, कानातील झुमके असा जवळपास सात तोळे सोन्याचा ऐवज होता. या दागिन्यांची किंमत अंदाजे आठ ते दहा लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, बीड बसस्थानकातील पोलीस चौकी गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने बसस्थानक परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोणतीही प्रभावी यंत्रणा नसल्याने चोरट्यांचे फावले असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

तसेच, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, “डीबी पथक फक्त नावालाच आहे का?” असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या घटनेमुळे बसस्थानक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button