
बीड, दि.11 (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात सध्या विनापरवाना गावठी पिस्टल वापरत असल्याचे चित्र दिसत आहे. बीड गावठी बनावटीची पिस्टल बाळगणाऱ्या एका इसमाला स्थानिक गुन्हे शाखा, बीडच्या पथकाने छापा टाकून जेरबंद केले आहे. ही कारवाई 10 एप्रिल रोजी रात्री उशिरा करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजे सोमनवाडी शिवारातील एका धाब्यावर विलास अंकुश चाटे हा गावठी पिस्टल बाळगत असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास संबंधित धाब्यावर छापा टाकला.
छाप्यात विलास चाटे याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून सुमारे 40 हजार रुपये किंमतीची गावठी बनावटीची पिस्टल जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस नाईक गोविंद भताने यांच्या फिर्यादीवरून बर्दापुर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 97/2026 नोंद करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध आर्म अॅक्टच्या कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी बर्दापुर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार गोविंद भताने, रामचंद्र केकान, मारोती कांबळे, विष्णु सानप, तसेच पोलीस अंमलदार सचिन आंधळे, विकी सुरवसे, अतुल हराळे आणि विकास राठोड यांचा समावेश होता.






