मोकाट कुत्र्यांचा बालकांवर हल्ला.
नागरिकांत भीतीचे वातावरण;न.पा.कुत्र्याचा बंदोबस्त करावा.

बीड : शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून,नगर पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. गल्लीबोळांपासून ते मुख्य रस्त्यांपर्यंत कुत्र्यांचे कळप मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. यामुळे लहान मुले, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक विशेषतः भयभीत झाले आहेत.
मागील काही महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तरीही नगरपालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. बार्शी नाका, मोमेंटपुरा, इस्लामपुरा, माळवेस, बालेपीर नगर, इमामपूर रोड, जुना बाजार, मोंढा, शिवाजीनगर, धानोरा रोड, नगर रोड, चाणक्यपुरी आणि शाहूनगर या भागांत कुत्र्यांचा वावर अधिक प्रमाणात दिसून येत आहे.
दरम्यान इस्लामपुरा येथील बाबा चौक परिसरात एक धक्कादायक घटना घडली. सय्यद वसीम यांच्या अवघ्या ४ वर्षांच्या मुलीला मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जखमी मुलीवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “नगरपालिकेचे उदासीन धोरणच या घटनांना कारणीभूत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही,” असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे तातडीने लक्ष घालून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी केली आहे. अन्यथा येणाऱ्या काळात आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.






