दर्शनादरम्यान दागिन्यांची चोरी उघड;महिला ताब्यात.
1.70 लाखांचा मुद्देमाल जप्त;बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

बीड, दि. — रामगडावर दर्शनासाठी आलेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे 1 लाख 70 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याच्या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी यशस्वी छडा लावत महिला आरोपीला अटक केली असून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दि. 26 मार्च 2026 रोजी फिर्यादी सोनाबाई रतन वैद्य (वय 75, रा. घोसापुरी, ता.जि. बीड) या रामगड येथे दर्शनासाठी गेल्या असता गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 99/2026 कलम 303(2) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतरपणे सुरू असताना पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जारवाल, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला. या कारवाईत दुर्पदाबाई परमेश्वर जाधव (रा. गांधीनगर पेठ, बीड) हिला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान आरोपी महिलेने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर तिच्याकडून चोरीस गेलेले 1 लाख 70 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. पुढील तपासासाठी आरोपीस बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, सपोनि जारवाल, पोउनि श्रीराम खटावकर तसेच पोलीस हवालदार सोमनाथ गायकवाड, आनंद मस्के, बाळु सानप, स्वाती मुंडे, मनोज परजणे, अश्फाक सय्यद व सिद्धेश्वर मांजरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.






