तार चोरीताना टॉवर कोसळून दोघांचा मृत्यू.
पुण्याहून बीडमध्ये आले होते,चोरांचा अपघाताचा बनाव उघड.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील नांदूर घाट परिसरात शनिवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. विजेच्या तारांची चोरी करण्याच्या प्रयत्नात हायव्होल्टेज टॉवर कोसळल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत्यू लपवण्यासाठी साथीदारांनी रस्ते अपघाताचा बनाव रचल्याचे उघडकीस आले आहे.
माहितीनुसार, पुणे येथून आलेल्या पाच ते सात जणांच्या टोळीने नांदूर घाट परिसरात तार चोरीचा डाव आखला होता. यामध्ये अविनाश पाटोळे आणि आकाश आडे हे दोघे टॉवरवर चढून तारा कापण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, अचानक टॉवर कोसळल्याने दोघेही त्याखाली दबून मृत्यूमुखी पडले.
या घटनेनंतर त्यांच्या साथीदारांमध्ये घबराट पसरली. पोलिस कारवाईची भीती वाटल्याने त्यांनी हा प्रकार अपघात असल्याचे भासवण्याचा निर्णय घेतला. मृतदेह कारमध्ये टाकून ते परभणीच्या दिशेने रवाना झाले. मात्र, तेथे पोहोचल्यानंतर इतर साथीदार मृतदेह गाडीतच सोडून फरार झाले.
यानंतर वाहन चालकाने रुग्णवाहिकेच्या मदतीने मृतदेह रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. पण मृतदेहांची स्थिती संशयास्पद वाटल्याने नातेवाईकांनी शंका व्यक्त केली. पुढील चौकशीत संपूर्ण प्रकार उघड झाला.
घटनेची माहिती मिळताच केज व परभणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. विजेच्या तारांच्या चोरीसाठी जीव धोक्यात घालणाऱ्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.






