ब्रेकिंग न्यूज

शिवसेना तालुकाप्रमुखावर हल्ला.

गावातील भ्रष्टाचाराची तक्रार दिल्याने हल्ला;गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न.

बीड (प्रतिनिधी) दिनांक 7 मार्च रोजी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास बीड तालुक्यातील वांगी गावात शिवसेना तालुकाप्रमुखावर हल्ला झाल्याची घटना घडली.

गावातील भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या शिवसेना (शिंदे गट) शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख हरिभाऊ शेळके यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (MGNREGS) कथित भ्रष्टाचाराबाबत गटविकास अधिकाऱ्याकडे पुराव्यानिशी तक्रार दिल्यानंतर हा हल्ला झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरिभाऊ शेळके हे सकाळच्या सुमारास वांगी गावात गेले असता काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर आधीपासून पाळत ठेवून अचानक हल्ला केला. हल्लेखोरांनी शेळके यांना मारहाण करत रुमालाने गळा आवळून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात शेळके गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गावातील गोरगरिबांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे आणि मनरेगा योजनेतील कथित गैरव्यवहाराविरोधात भूमिका घेणारे शेळके यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.

दरम्यान, मागील महिन्यात ढेकणमोह येथेही ग्रामपंचायतीच्या कथित मनमानी कारभाराला कंटाळून शिवसैनिकांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच वांगी गावातील या हल्ल्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक व शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button