होळीच्या रंगांमध्ये बेरंग! नाळवंडी येथे धुरवडीच्या दिवशी तरुणांवर चाकू हल्ला.
हल्ल्यात तिन गंभीर जखमीना रुग्णालयात उपचार सुरू.

बीड(प्रतिनिधी)होळी हा सन रंगांचा,आनंदाचा व उत्साहाचा सण असलेल्या होळीच्या दिवशी नाळवंडी गावात रक्तरंजित घटना घडल्याने सणावर विरजण पडले. धुरवडीच्या दिवशी (३ मार्च) गावातीलच पाच ते सहा जणांनी जातिवाचक शिवीगाळ करत, एका दलित समाजाच्या तरुणावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत तिघे तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमींची नावे पुढीलप्रमाणे :
आकाश अशोक कानडे (वय २४, रा. धनगरवस्ती, नाळवंडी),अभिषेक श्रीमंत म्हेत्रे (वय २४, रा. म्हेत्रे वस्ती, नाळवंडी)आणि विशाल भीमराव म्हेत्रे (वय २२, रा. म्हेत्रे वस्ती, नाळवंडी).
मिळालेल्या माहितीनुसार, वादातून सुरू झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर मारहाणीत झाले. एका तरुणाच्या हातावर चाकूने वार करण्यात आला. जातिवाचक शिवीगाळ झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सणाच्या दिवशी घडलेल्या या प्रकारामुळे गावात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.
घटनेनंतर जखमींना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, एवढी गंभीर घटना घडूनही अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
होळीच्या रंगांमध्ये आनंद फुलायचा असताना, नाळवंडीत मात्र हा सण रक्ताच्या सावटाखाली बेरंग झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.




